उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्याऱ्या दोघांना अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने तपास सुरू केला. या तपासादरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही गावातून मंगेश अच्युतराव वायाळ (वय-३५) आणि अभय गजानन शिंगणे (वय-२२) या दोघांना अटक करण्यात आली. सध्या पोलिसांनी त्यांना मुंबईकडे रवाना केले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून ई-मेलद्वारे धमकी
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवण्याची धमकी गोरेगाव पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने ई-मेलचा स्रोत शोधून काढला आणि संबंधित आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेतला. या तपासादरम्यान, मुंबई आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने देऊळगाव मही गावात छापा टाकून दोघांना अटक केली.

दोघेही नातेवाईक, दारूच्या नशेत धमकी दिल्याचा संशय
पोलिस तपासात समोर आले की, मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे हा मोबाईल शॉपी चालवतो. विशेष म्हणजे, हे दोघेही नात्याने आतेभाऊ-मामाभाऊ आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, आरोपींना दारूचे व्यसन असून अभय शिंगणेच्या मोबाईल शॉपीमधूनच हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. तपास यंत्रणांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले आहे.

काय आहे एकनाथ शिंदे यांना धमकी प्रकरण?
गुरुवारी सकाळी गोरेगाव पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी असलेला ई-मेल आला. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. ही धमकी केवळ गोरेगावच नव्हे, तर मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांनाही पाठवण्यात आली होती. ई-मेलमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा स्पष्ट उल्लेख होता. यावरून पोलीस अधिक सतर्क झाले आणि गुन्हा दाखल करत तपासयंत्रणांनी आरोपींना शोधण्यास सुरुवात केली.

आरोपींवर कठोर कारवाई होणार
मुंबई गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलीस दलाने जलद गतीने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून तपासादरम्यान आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली धमकी हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याने राज्य सरकार आणि पोलिसांकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Protected Content