जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब अफजल खान पठाण वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद वय-२१ दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
जळगाव शहरातील कोर्ट चौक, सुभाष चौक, नेहरू चौक या ठिकाणाहून दुचाकी तर खोटे नगर भागातून मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शोएब पठाण आणि शेख आवेश शेख मोहम्मद हे दोन्ही चोरीच्या दुचाकीवरून पिंप्राळा हुडको भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, पोलीस कॉन्स्टेबल संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, हरिलाल पाटील, पोलीस नाईक प्रवीण भालेराव यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी शोएब अफजल खान पठाण वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद वय-२१ दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव या दोघांना अटक केली. त्यानंतरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीच्या दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.