Home क्राईम  मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघे आरोपी गजाआड

 मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघे आरोपी गजाआड


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी गावातील रहिवासी ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी यांच्या अंगणातून चोरट्यांनी चोरून नेलेली ३५ हजार रुपयांची हिरो कंपनीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी हस्तगत करत दोन चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पारोळा पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.

दि. २१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजेनंतर कोळपिंपरी येथून ज्ञानेश्वर कोळी यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH 54 A 2195) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपास पोलीस हवालदार सुनील हटकर यांच्या कडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान प्रभारी अधिकारी सचिन सानप यांना गुप्त माहिती मिळाली की गावातील अभय प्रवीण पाटील आणि त्याचा साथीदार मयूर देवरे यांनी ही चोरी केल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील आणि पोलीस अंमलदार अनिल राठोड यांच्या पथकाची रचना करून अमळनेर शहरात सापळा लावण्यात आला.

आरोपी अभय पाटील हा अमळनेरमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून त्याचा मोबाईल क्रमांक शोधून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, मोटारसायकल त्याच्या साथीदार मयूर तुळशीदास देवरे (रा. खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक) याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने मालेगाव येथे धाड टाकून मयूर देवरेलाही अटक केली.

दोघा आरोपींनी चौकशीदरम्यान चोरीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किमतीची हिरो मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यात आलेल्या या कारवाईमुळे पारोळा पोलिसांची प्रशंसा होत आहे.

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील, महेश पाटील आणि पोलीस अंमलदार अनिल राठोड यांच्या अथक प्रयत्नांमुळे गुन्हा उघडकीस आला.


Protected Content

Play sound