
पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मिठाच्या पोत्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत दोन चोरट्यांना अटक केली असून, चोरी गेलेला सर्व मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दिनांक 12 जुलै 2025 रोजी, पारोळा येथील बहिरम गल्लीतील रहिवासी आणि ‘शिव प्रोविजन’ दुकानाचे मालक शंकर बागनमल सिंधी (वय 64) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की, त्यांच्या दुकानातून टाटा नमक कंपनीच्या मिठाची 12 पोती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. या पोत्यांची अंदाजित किंमत 16,800 रुपये इतकी होती. ही चोरी 4 आणि 5 जुलैच्या रात्री घडल्याचा अंदाज असून, नगर परिषद परिसरातील दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीस घेण्यात आले.
तपास करत असताना, हेड कॉन्स्टेबल संजय पवार व पोलीस अमलदार अजय बाविस्कर यांनी मिळवलेल्या फुटेजमधील संशयित व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यानंतर एक गोपनीय बातमीदार पुढे आला आणि दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रद्धा नगर, गलवाडे रोड, अंमळनेर येथील 1) राजू पंडित बच्छाव आणि 2) रमेश जाधव उगरेच्छा यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजूर केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरी गेलेले टाटा नमक कंपनीचे एकूण 12 पोते पंचासमक्ष पोलिसांना दिले, जे पोलिसांनी जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने मूळ तक्रारदार श्री. सिंधी यांना सुपूर्द केले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ, डीवायएसपी अमळनेर व पोलीस निरीक्षक पारोळा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल संजय पवार, शरद पाटील, महेश पाटील व पोलीस अमलदार अजय बाविस्कर यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
या यशस्वी कारवाईमुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुकही करण्यात येत आहे.



