Home Cities जळगाव नूतन मराठा महाविद्यालयाचे बारा विद्यार्थी ठरले ‘युवा विज्ञान प्रसारक 

नूतन मराठा महाविद्यालयाचे बारा विद्यार्थी ठरले ‘युवा विज्ञान प्रसारक 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करून त्यांना संशोधनाभिमुख शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘शनिवारी विज्ञान वारी’ या अभिनव प्रकल्पात जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्या वतीने या प्रकल्पासाठी नऊ विद्यार्थिनी आणि तीन विद्यार्थी अशा एकूण बारा जणांना ‘युवा विज्ञान प्रसारक’ म्हणून प्रशिक्षणासाठी निवडले गेले आहे.

‘शनिवारी विज्ञान वारी’ हा मराठी विज्ञान परिषद मुंबईचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांना विज्ञान प्रयोग पेटी व प्रयोग पुस्तिका देऊन वर्षभर शहरातील सहा शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष विज्ञान प्रात्यक्षिके सादर करण्याची संधी दिली जाते. हे प्रात्यक्षिके पाचवी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी असतात व महिन्यातून दोन शनिवारी शाळांना भेट दिली जाते.

या उपक्रमामुळे विज्ञान विषय विद्यार्थ्यांना अधिक सोप्या, प्रात्यक्षिकांद्वारे समजण्यास मदत होते. पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रयोगाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होते आणि त्यांची वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होतो. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील शाळांमध्ये या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे जग अधिक जवळून अनुभवता येते.

या उपक्रमासाठी नूतन मराठा महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख आणि मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे सचिव प्रा. दिलीप भारंबे यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांचेही या उपक्रमास बहुमोल सहकार्य लाभले आहे.

या निवडीबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील, प्रा. महेंद्र हायलिंगे आणि प्रा. हिरे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांद्वारे विज्ञान विषय समाजात रुजवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, ते भविष्यातील वैज्ञानिक संस्कृती घडवण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नूतन मराठा महाविद्यालयातील हे बारा युवा विज्ञान प्रसारक ‘शनिवारी विज्ञान वारी’ प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या पातळीवर एक मोठा बदल घडवण्याची क्षमता बाळगून आहेत. त्यांच्या कार्यामुळे विज्ञानाचे आकलन अधिक सुलभ होऊन संशोधनाची रुची निर्माण होईल, हीच या उपक्रमामागची प्रमुख भावना आहे.


Protected Content

Play sound