Home Cities पारोळा पारोळा रुग्णालयातील एसी बंद करा; वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन

पारोळा रुग्णालयातील एसी बंद करा; वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील कुटीर रुग्णालयातील प्रशासकीय कक्षात सुरू असलेली एअर कंडिशनिंग (एसी) यंत्रणा तातडीने बंद करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना प्रशासकीय दालनातील एसीमुळे विजेचा अनावश्यक वापर होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील कुटीर रुग्णालयातील काही प्रशासकीय दालनांमध्ये एसी यंत्रणा सुरू ठेवली जाते. मात्र रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत प्रशासकीय कक्षात एसीचा वापर होणे योग्य नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, रुग्णालय ही सार्वजनिक सेवा देणारी संस्था असून येथे रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. प्रशासकीय दालनात चालू असलेल्या एसीमुळे विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून तो थेट जनतेच्या कराच्या पैशांचा अपव्यय असल्याचे निवेदकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एसी यंत्रणा तातडीने बंद करून विजेची बचत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता जाकीर पिंजारी व सामाजिक कार्यकर्ता शाकीर जाकीर पिंजारी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर करून या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशारा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound