मुंबई प्रतिनिधी । नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
“माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा लढा हा सकारात्मक विचार आणि कृतीतून लढता येतो. सशक्त इच्छाशक्ती, केंद्रीत लक्ष आणि संयुक्त प्रयत्नांची त्याला जोड आवश्यक आहे,” असे ट्विट तुकाराम मुंढेंनी केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्ट लिहित जनतेला आवाहन केलं होतं. “मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना 24 ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.”
“ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो,” असंही तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं. त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात आणि शेवट ऑल इज वेल असं लिहून केली. यातून त्यांनी सर्व काही ठिक आहे, असाच संदेश दिला आहे.