धरणगाव, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या धानोरे येथे शिवभोलेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी यात्रा भरणार असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील महादेवाचे दर्शन घेतल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे. परिसरातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने व संख्येने दरवर्षी येथे दर्शनासाठी हजेरी लावत असतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की, फार वर्षांपूर्वी गावातील अडाणी गुराखी दररोज गुरे घेऊन चारायला येथे जायचा आणि दुपारची वामकुक्षी याठिकाणीच घ्यायचा हा त्याचा नित्य नेम होता. अचानक एकेदिवशी तिथे अनोळखी स्त्री-पुरुष आलेत आणि त्याची परीक्षा घेतली. ते अचानक गायब झाल्याने गुराख्याचा विश्वास बसला आणि त्याने दुसऱ्या दिवशी मातीची पिंड तयार केली अन भक्ती भावाने पूजा करू लागला. आज या ठिकाणी परिसरातील नागरिक व भक्तांच्या आर्थिक मदतीने मंदिराचे स्वरूप भव्य-दिव्य झाले असून श्रावण महिन्यात भक्तांची गर्दी दर्शनासाठी असते. मंदिर जंगलात असून श्रावणात हिरवळीने हा परिसर सुंदर रूप धारण करत असतो.