जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्षयरोग दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगावच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग व मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभाग, रेड क्रॉस सोसायटी, रेड रिबीन क्लब आणि एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने तरसोद, भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात एम.एस्सी., बी.एस्सी. नर्सिंग आणि जीएनएम अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्षयरोगासंदर्भात जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच, पोस्टर प्रदर्शन, स्लोगन स्पर्धा आणि गावातून रॅली काढण्यात आली. या माध्यमातून ग्रामस्थांना क्षयरोगाची लक्षणे, कारणे, उपचार पद्धती, प्रतिबंधक उपाययोजना आणि शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे देण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश जावळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. गरज आहे ती केवळ वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण उपचारांची.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा. जसनीत दया, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. निर्भय महोद, प्रा. स्वाती गाडेगोने, प्रा. आश्लेषा मुन, प्रा. दिवाना पवार, प्रा. रितेश पडघम, प्रा. गिरीश खडसे विभागप्रमुख, प्राध्यापक, आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटमार्फत राबवले जाणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.