Home Cities जळगाव सेवानिवृत्तीनंतरच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची सुरुवात होते; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

सेवानिवृत्तीनंतरच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची सुरुवात होते; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माणसाचे बालपण कसे गेले हे समजत नाही, तारुण्य शिक्षणात आणि त्यानंतरचे आयुष्य नोकरी, लग्न व संसार स्थिर करण्यात खर्च होते. मात्र, सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्यावर स्वतःसाठी जगण्याची खरी सुरुवात होते. या काळात आपले आनंद आणि छंद जोपासण्यासाठी ‘वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघ’ ही खऱ्या अर्थाने आनंदाची खाण ठरत आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले. शहरातील रिंग रोडवरील रामकृष्ण योग केंद्रामध्ये वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी अध्यक्ष धनराज पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर झांबरे, सचिव विश्वनाथ वाणी, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील, सतीश जंगले, भानुदास पाटील आणि संयोजक डॉ. नितू पाटील उपस्थित होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले की, उतारवयात नातवंडांच्या सहवासात विरंगुळा मिळतोच, परंतु स्वतःचे उरलेले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ अत्यंत उपयोगी पडतात. आरोग्य, अध्यात्म, आत्मज्ञान आणि आनंद या चतुरसूत्रीवर आधारित हा संघ ज्येष्ठांना जगण्याची नवीन दिशा देणारा ठरत आहे. गेल्या सोळा वर्षांपासून डॉ. नितू पाटील यांचे सामाजिक कार्य मी जवळून पाहत असून, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे केलेले हे संघटन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वर्धापन दिनाचे खास आकर्षण म्हणजे ‘ज्येष्ठ नागरिक भूषण पुरस्कार’ सोहळा. ज्या सभासदांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा रमण शंकर भोगे, श्रीमती इंदुबाई सपकाळे, प्रभाकर झांबरे, मधुकर बेंडाळे, सुरेश नेहेते, सुरेश बेलसरे आणि रमेश चौधरी यांचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, श्रीमद्भगवद्गीतेचे १२ पाठ कंठस्थ केल्याबद्दल नूतन अध्यक्ष प्रकाश पाटील यांना ‘गीता पथिक’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ललिता टोके यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितेने उपस्थितांची मने जिंकली. आगामी गुढीपाडव्याचे औचित्य साधून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकरे यांनी तयार केलेल्या ‘सामाजिक समरसता २०२६’ दिनदर्शिकेचे वाटपही सर्व सभासदांना करण्यात आले.

या कार्यक्रमात जुन्या कार्यकारिणीला निरोप देऊन नवीन कार्यकारिणीचे जंगी स्वागत करण्यात आले. माजी अध्यक्ष धनराज पाटील यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर संयोजक डॉ. नितू पाटील यांनी गेल्या १० वर्षांतील कार्याचा आढावा घेत आगामी वर्षात ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या संकल्पनेखाली धार्मिक सहली, प्रवचन आणि कीर्तनासारखे उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन भानुदास पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound