
रावेर (प्रतिनिधी) शहरातील सावदा रोडवरून एक ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने वाहतूक व्यवसायकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, रावेर शहरातील सावदा रोडवरील महाजन हॉस्पिटल जवळ 2010 च्या मॉडेल असलेला टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (एमएच 19 सीवाय 2603) पांढऱ्या रंगाची कॅबिन असलेला ट्रक उभा होता. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हा ट्रक चोरून नेला. याबाबत शे एजाज शे फयाज (रा.इमामवाडा, रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन भाग 5 गु.र.न 149/19 भादवी 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे.