Home क्राईम ट्रॅक्टरला वाचवताना ट्रक पलटी; राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात !

ट्रॅक्टरला वाचवताना ट्रक पलटी; राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराला लागून असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर (हायवे) आहुजा नगर स्टॉपजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. आहुजा नगरकडून अचानक भरधाव वेगाने महामार्गावर आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि अद्रक (आले) भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

अपघातानंतर ट्रकमधील शेकडो टन अद्रक रस्त्यावर विखुरले. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघात मध्यरात्री घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने, या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुखरूप आहेत. जळगाव शहरातील बांभोरी ते खोटे नगर स्टॉप या दरम्यान महामार्गावर सध्या समांतर रस्त्यांचे काम सुरू आहे. रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या भागात अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या अपघातामुळे विस्कटलेली वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणि रस्त्यावर विखुरलेले अद्रक बाजूला करण्यासाठी पोलीस आणि महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.


Protected Content

Play sound