Home क्राईम त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरण: गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा – काँग्रेसची राज्य सरकारकडे...

त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरण: गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा – काँग्रेसची राज्य सरकारकडे जोरदार मागणी

0
97

नाशिक – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संतप्त प्रतिक्रिया नोंदवत राज्य सरकारकडे हल्लेखोर गुंडांविरोधात तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे.

या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “हा हल्ला केवळ पत्रकारांवर नव्हे, तर संपूर्ण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचाच हल्ला आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून मारहाण करण्याचे प्रकार अत्यंत धक्कादायक असून, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे.”

सपकाळ यांनी पत्रकार किरण ताजणे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, या हल्ल्यात संबंधित पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दर्शवते की राज्यात कोणीही सुरक्षित नाही. आज गुंड खुलेआम पत्रकारांवर हल्ले करत आहेत आणि राज्य सरकार मूकदर्शक बनून बसले आहे.

पत्रकार संरक्षण कायदा अद्याप लागू न झाल्याबाबतही काँग्रेसने सरकारला धारेवर धरले. “राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज आहे. माध्यमकर्मींसाठी सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सध्या परिस्थिती उलट आहे – गुंड मोकाट सुटले आहेत, तर पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होत आहेत,” असेही सपकाळ यांनी नमूद केले.

काँग्रेसने या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठवली. “फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. वाढते गुन्हे, अपप्रवृत्तींचा सुळसुळाट आणि पत्रकारांवरचे वाढते हल्ले हे त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम आहेत,” असा घणाघात सपकाळ यांनी केला.

या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकार संघटनांनीही संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेने पत्रकार सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound