जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी कोळी समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी आणि समाजातील महिला शक्तीला बळ देण्यासाठी जळगावात एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा कोळी जमात विकास मंच आणि ‘रणरागिणी ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी, ३१ जानेवारी रोजी राज्यस्तरीय ‘उपवर-वधू परिचय मेळावा’ आणि ‘युवा महोत्सव’ पार पडणार आहे. शहरातील बीएसएनएल ऑफिसच्या मागे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न होईल.

महिलांच्या नेतृत्वात ऐतिहासिक पाऊल :
या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून समाजातील ५० ते ५१ महिला भगिनी या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजकत्व आणि नियोजन सांभाळत आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कोळी समाजाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि रणरागिणी ग्रुपच्या स्नेहा सोनवणे यांनी सविस्तर तपशील दिला.

वेळ आणि श्रमाची बचत:
एकाच छताखाली शेकडो स्थळे विवाह जमवताना वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांच्या कुटुंबांना अनेक ठिकाणी फिरावे लागते, यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. ही समस्या ओळखून ‘टाइम मॅनेजमेंट’ आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या आयोजकांकडे २०० हून अधिक मुला-मुलींचे बायोडाटा प्राप्त झाले आहेत. या मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष परिचय होऊन काही विवाह किंवा साखरपुडे देखील निश्चित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर १० दिवसांच्या आत सर्व सहभागींना वधू-वर परिचय सूची मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
समाज बांधवांना आवाहन :
या सोहळ्याला समाजातील अधिकारी, नवनिर्वाचित राजकीय पदाधिकारी आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. “पालकांनी आपल्या मुला-मुलींना सोबत घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी हा मेळावा एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास स्नेहा सोनवणे, शोभाताई आणि इतर रणरागिणींनी व्यक्त केला आहे.



