Home Cities जळगाव पिंप्राळा स्मशानभूमीत वृक्षारोपण व सिमेंट बेंच लोकार्पण; स्व. मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ...

पिंप्राळा स्मशानभूमीत वृक्षारोपण व सिमेंट बेंच लोकार्पण; स्व. मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमर जैन यांच्या सौजन्याने तसेच भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशन व जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून नागरिकांसाठी सिमेंट बेंचचेही लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशनतर्फे सुमारे ५० झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. स्मशानभूमी परिसर हरित आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने या झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपणामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, अमर जैन, जाकीर पठाण, नरेंद्र पाटील तसेच अतुल बारी, विवेक सोनार, सागर पाटील, प्रथमेष भार्गव, सागर मराठे, एन.जी.पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सोयीस्कर ठराव्यात यासाठी उभारण्यात आलेल्या सिमेंट बेंचचे लोकार्पणही करण्यात आले. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना काही काळ विश्रांती घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. शहरात हरित पट्टा वाढविण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

 


Protected Content

Play sound