नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. तपोवन परिसरात नवीन एसटीपी प्लांट उभारण्याच्या नावाखाली ३०० हून अधिक झाडांची कत्तल सुरू झाली आहे. पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाने ही वृक्षतोड सुरू केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

१८०० झाडांचा प्रश्न अनुत्तरित
कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्याची योजना आहे, ज्यासाठी तब्बल १८०० झाडं तोडावी लागण्याची भीती आहे. या मुख्य प्रश्नावर तोडगा निघालेला नसतानाच एसटीपी प्लांटसाठी वृक्षतोड सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींनी प्रशासनावर टीका केली आहे. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देत वृक्षतोडीचा निषेध केला आणि हा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला आहे.

शेतकऱ्यांकडून रोख मोबदल्याची मागणी
एकीकडे वृक्षतोडीचा वाद सुरू असतानाच, दुसरीकडे साधुग्रामसाठीच्या भूसंपादनातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेने ५० टक्के टीडीआर आणि ५० टक्के रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु, जागामालक आणि शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव पूर्णपणे धुडकावून लावला असून, त्यांना बाजारभावानुसार केवळ रोखीने मोबदला हवा आहे. यामुळे साधुग्राम प्रकल्पाचे भविष्यही अनिश्चित झाले आहे.
या वादग्रस्त परिस्थितीत, पर्यावरणप्रेमी संघटना आणि महापालिका अधिकारी यांनी नुकतीच संयुक्त पाहणी सुरू केली आहे. हैदराबाद येथून नाशिकसाठी १५ हजार रोपे आणली जात असून, ती गोदावरी, नंदिनी, कपिला नद्यांच्या किनाऱ्यावर तसेच पेलिकन पार्कसारख्या ठिकाणी लावून पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.



