यावल (प्रतिनिधी) तालुक्यात तापमानाने सध्या उच्चांक गाठला आहे. या वाढलेल्या तापमानात लग्नसराई जोरात आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लग्नाला जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास सोपा वाटतो. त्यामुळे प्रवासी आपापल्या गावातील एस. टी. बसस्थानकांवर येतात. मात्र तालुक्यातील अनेक गावात आजही बसथांबे नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत. तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
अधिक वृत असे की, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला हा तालुका असुन या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात ६७ ग्राम पंचायती व जवळपास ८४ गावे जोडली गेलेली आहेत, यातील ५०च्या वर गावांना आजही प्रवाशी निवारे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या मोठया गावांना प्रवाशी निवारे नाहीत ती गावे पुढील प्रमाणे आहेत. हंबड्री, हिंगोणा, सांगवी, न्हावी, बामणोद, महेलखेडी, कोरपावली, हरीपुरा, सातोद, वड्री, निमगाव, अंजाळे, टाकरखेडा, बोरावल, अट्रावल, राजोरा, बोरखेडा, यांच्याशिवाय अनेक अतिदुर्गम भागात देखील ज्या ठीकाणी प्रवाशी एस.टी. बसेस जात असतात. तिथेही आजपर्यंत प्रवाशी निवारे नसल्याने या रणरणत्या उन्हाळ्यात व पावसाळ्यात एस.टी. बसची वाट बघत प्रवाशांना आपल्या कुटुंबासह उघड्यावर थांबावे लागते. या सर्व प्रकारामुळे अखेर चोपडा व रावेर विधानसभा क्षेत्राशी जोडलेल्या यावल तालुक्याला दोन-दोन आमदार असतांनाही प्रवाशी निवारे नसल्याने राज्य शासनाकडे प्रवाशी निवारा उभारण्यासाठी निधी आहे की नाही? असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत.