अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोरी नदीपात्रात आपल्या म्हशीला शोधण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा पुरात बुडून मृत्यू झाल्याची करूण घटना घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वृष्टीमुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यंदा पहिल्यांदाच बोरीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. तथापि, याबाबतची माहिती आधी देण्यात न आल्यामुळे खालील बाजूला असलेल्या शेतकर्यांसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून पाणी सोडण्याची पूर्वसूचना मिळणे आवश्यक असल्याचा सूर उमटला आहे.
दरम्यान, बोरी नदीला अचानकपणे आलेल्या पुरात पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कमलाकर हिंमत पाटील या शेतकर्याची म्हैस सापडली. आपल्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि, यात यश आले नाही. अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले.
मयत कमलाकर हिंमत पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत असून यातूनच त्यांनी मुलगा व मुलगीला उच्चशिक्षीत केले आहे. गावासह परिसरात ते दुधवाला आबा म्हणून परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
पाश्चत त्यांचा पत्नी एक मुलगा एक मुलगी तसेच तीन भाऊ असा परिवार असून,दूध विक्री व्यवसायातून त्यांनी मुलगा व मुलगी यांना उच्च शिक्षित केले आहे.गावात व परिसरात ते दूधवाला आबा म्हणून परिचित होते.