एरंडोल प्रतिनिधी । अकाली मृत पावलेल्या मुलाच्या विरहात त्याचे उत्तरकार्य होण्याआधीच एका महिलेने प्राण सोडल्याची घटना येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, याबाबत माहिती अशी,कि शहरातील पदमाई पार्क येथील रहिवासी तथा राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचारी मधुकर त्रंबक दुबे यांचा मुलगा मिलिंद मधुकर दुबे (वय ५२) यांचे १ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम सोमवारी (ता.१३) होणार होता. मिलिंद दुबे हे सुमारे आठ ते दहा वर्षांपासुन आजारपणामुळे अंथरुणावर होते.त्यांचे बंधु मुकेश दुबे व नितीन दुबे हे दहा वर्षांपासुन भावाची संपुर्ण सेवा करीत होते. मुलगा मिलिंद याच्या आजारपणामुळे त्याची आई उषाबाई दुबे या देखील अस्वस्थ झाल्या होत्या. एक मे रोजी मुलगा मिलिंद याचे दुखःद निधन झाल्यामुळे आई उषाबाई देखील मानसिक दृष्टया खचुन गेल्या होत्या.तरुण मुलाचा मृत्यु झाल्यामुळे वृद्ध आईने देखील आज सकाळी प्राण सोडल्यामुळे दुबे परिवारावर शोककळा पसरली आहे. एरंडोल शहरात दुबे परिवाराची सर्वांच्या सुख दुखाःत सहभागी होणारा परिवार म्हणुन ओळख आहे. यामुळे दुबे परिवारावरील आघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.