अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथे अमळनेर-धरणगाव रस्त्यावर आयटीआय कॉलेजजवळ कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोकुळ मुरलीधर पाटील (वय-५१) रा. टाकरखेडा ता. अमळनेर असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी संगीताबाई पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. अधिक माहिती अशी की, गोकुळ पाटील व त्यांच्या पत्नी हे गावातून आपल्या शेताकडे जात होते. यावेळी गावातील आयटीआय कॉलेज जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मात्र, पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संगीताबाई यांना पुढील उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत गोकुळ पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गोकुळ पाटील हे भिलाली ता.अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
प्रामाणिक शिक्षकाचा करुण अंत
गोकुळ पाटील हे गेल्या ३० वर्षापासून विनावेतन काम करीत होते. सुरुवातीला टाकरखेड़े येथे विनाअनुदानित शाळेत त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. मात्र शासनाचा दुटप्पी धोरणामुळे त्या शाळेला अनुदान प्राप्त झाले नाही. गेल्या ३० वर्षापासून ती शैक्षणिक संस्था टाकरखेड़े येथून बदली झाल्याने ती भिलाली येथे सुरु झाली होती. सरांचे वय ५१ असूनही त्यांचे गेल्या ३१ वर्षापासून अखंड विनावेतन काम सुरु होते. आत्ता कुठे २० टक्के पगार मिळणार या आकांशा असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विनावेतन असताना मुलाला केले उच्चशिक्षित
गेले तीस वर्ष विनावेतन काम करूनही गोकुळ पाटील यांनी मिळेल ते काम करीत संसाराचा राहाट गाडा यशस्वी चालविला.त्यांची पत्नी या आशास्वयमसेविका म्हणून काम करीत त्यांनी हातभार लावत मुलाला दोन वर्षापुर्विच एअर फोर्स मध्ये नोकरी मिळवली होती.त्यामुळे घरात आत्ता सुखाचे दिवस आल्याने विनावेतन काम करूनही आपल्या वडिलांनी आपल्याला या पदापर्यंत मजल मारल्याने मुलाने त्यांना दुचाकी घेऊन दिली होती.आज शेतात जाताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला.यामुळे गेल्या एकवीस वर्षापासून न्यानदान करनारे शिक्षक गावातून अचानक अपघाती मृत्युने गेल्यामुळे संपूण गावात शोककला पसरली होती. उद्या ता.२२ रोजी अकरा वाजेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या पच्यात पत्नी आणि एक मुलगा आहे.