एरंडोल प्रतिनिधी | जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण अपघातांचे सत्र कायम असून रात्री भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, जिल्ह्यात सध्या अपघातांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. जामनेर तालुक्यात लागोपाठ दोन दिवसांमध्ये दोन भीषण अपघात झाले असून यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. रात्री साधारणपणे साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे तिघे जागीच ठार झाले. यात बलदीप सुकटा पवार (वय ३२), बबलू बच्चन भोसले (वय २२) आणि गोटू पिंटू चव्हाण (वय १२) या तिघांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर संबंधीत कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या अपघातातील मृतदेह शव विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. तर रात्री उशीरापर्यंत या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.