जळगाव, प्रतिनिधी | डिसेंबर महिन्यात निमगव्हाण जवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम शासनामार्फत करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल एक महिनाभर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कळवले आहे. त्यासाठी या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राज्य मार्ग -१५, म्हणजेच धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन या रस्त्यावरील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम शासनामार्फत करण्यात येणार असून सदर कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाल या कंपनीला देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नविन एक्सापान्शन जॉइंट बसविणे इ. बाबींचा समावेश आहे. कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नविन बेअरींग बसविणे, प्रस्तावीत असल्याने पुलावरील वाहतूक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारून पर्यायी मार्ग बनविणेही अशक्य असल्या कारणाने सदर रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून वळविणे आवश्यक आहे.
त्यानुसार चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर व चोपडा ते धरणगाव अशा तिनही मार्गावरून होणारी सर्व प्रकारची वाहतुक रविवार, दिनांक ०१/१२/२०१९ ते सोमवार दिनांक ३०/१२/२०१९ पावेतो बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणा-या वाहतुकीकरीता नागरिकांनी पर्यायी मार्ग चोपडा, अडावद, धानोरा, जळगाव या मार्गाचा वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणा-या वाहतुकीकरीता नागरिकांनी चोपडा, हातेड बू || मार्ग, तसेच अमळगाव, जळोदमार्गे या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या वाहतुकीकरीता चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आदेश डॉ. उगले यांनी काढले आहेत.