जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेशिस्त वाहनधारकांना धडा शिकविण्यासाठी पोलीस दलाकडील वाहतूक शाखेचे सहकार्य दिले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते.
येथील शासकीय रुग्णालयात गेट क्र. १ मधून रुग्णवाहिका, पोलिसांचे चारचाकी वाहन आणि गंभीर रुग्णांना आणणारी वाहने यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. इतर सर्व वाहनांसाठी गेट क्र. २ मधून वाहनतळाकडे प्रवेश दिला जात आहे. तरीदेखील काही वाहनधारक सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालीत गेट क्र. १ मधून वाहने आत नेत आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. चक्क नो पार्किंग फलकाजवळ वाहने उभी करीत आहेत.
शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी परिसर पाहणी केली होती. त्यावेळी बेशिस्त वाहनधारकांच्या मुद्द्यांवर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी डॉ. मुंढे त्यांच्यासमोरच पोलिसांच्या वाहनांची हवा काढून टाकण्यात आली. यावेळी डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयात सामान्य नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात. अशावेळी वाहनधारकांनी हुज्जत घालणे चुकीचे आहे. अशा वाहनधारकांची माहिती वाहतूक शाखेला दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे नियोजन करता येईल, असेही डॉ. मुंढे यांनी सांगितले. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध यॊजनांची आणि परिसराची माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण आदी उपस्थित होते.