भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात संत मुक्ताई दिंडीच्या आगमनाने पुन्हा एकदा भक्ती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा गौरवशाली सोहळा अनुभवायला मिळाला. सालाबादप्रमाणे यंदाही मेहून तालुका पाचोरा येथून निघालेली संत मुक्ताईंची दिंडी भुसावळ येथे दुपारच्या विश्रांतीसाठी दाखल झाली आणि संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
भुसावळ येथील वांजोळा रोड भागात राहणारे संजय सिंग चव्हाण यांच्या निवासस्थानी या दिंडीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. दिंडी आल्यावर भजन-कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम पार पडला. वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या निनादात संत मुक्ताईंचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर सर्व वारकऱ्यांसाठी प्रसादी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर पुन्हा भजन-कीर्तन आणि “मुक्ताई माऊली”च्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली.

या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, विठ्ठल नामस्मरण आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी ही वारी पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. संजय सिंग चव्हाण व त्यांच्या परिवाराने दिंडी आणि पादुकांचे दर्शन घेत वारकऱ्यांची सेवा केली. यावर्षी या दिंडीचे हे बारावे वर्ष असून, ही परंपरा अखंडपणे जपली जात असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रसंगी भुसावळ नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे, युवा नेते अनिल चौधरी, उद्योगपती मनोज बियाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. सर्व मान्यवरांनी या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले.



