Home Cities जळगाव कानळदा येथे पारंपरिक देवकाठी उत्सव उत्साहात 

कानळदा येथे पारंपरिक देवकाठी उत्सव उत्साहात 


जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावात दरवर्षी विजयादशमीच्या आदल्यादिवशी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा देवकाठी उत्सव यंदाही दिमाखात व भक्तिभावाने पार पडला. गावकरी, महिला मंडळे व युवक मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उत्सवात रंग भरले.

या वर्षीचा देवकाठी महोत्सव भगवान भगत नत्थू लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. देवकाठी उभारणीपासून ते मिरवणुकीपर्यंतच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी एकदिलाने सहभाग घेतला. गावातील महिला मंडळे व युवक मंडळांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत उत्सवात जीव ओतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक कानळदा येथे दाखल झाले होते. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी या उत्सवाला येतात, त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले गावकरीदेखील या दिवशी आपल्या कुटुंबीयांसह गावात हजर राहतात आणि देवकाठी उत्सवात श्रद्धेने सहभागी होतात. यामुळे गावात उत्सवाला जणू पुनर्मिलनाचे स्वरूप प्राप्त होते.

उत्सवाची सुरुवात गावातील मरीमाता मंदिरापासून करण्यात आली. तेथून देवकाठीची भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी भगवान भगत यांची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले होते.

या उत्सवामुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडले. ग्रामस्थ, भाविक, महिला आणि युवक यांचा सुसंवाद आणि समन्वय पाहता, या उत्सवाचे महत्त्व केवळ धार्मिक मर्यादेत न राहता, सामाजिक एकत्रतेचा सुंदर अनुभव ठरतो.


Protected Content

Play sound