पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहेजी-कुरंगी परिसरातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींमुळे महसूल विभाग आता सक्रिय झाला आहे. महसूल विभागाने गोपनीय पद्धतीने धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केला असून, तो पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथक तयार केले आहे. या पथकामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे, सहाय्यक महसूल अधिकारी योगेश सोनवणे, सहाय्यक महसूल कर्मचारी मनोहर राजेंद्र, शिपाई कैलास श्रावणे आणि गुलाब पाटील यांचा समावेश होता. त्यांनी गोपनीय गस्त घालून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. यामुळे शासनाचा महसूल बुडत होता, तसेच पर्यावरणाचीही मोठी हानी होत होती. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल विभागाने कठोर पाऊल उचलले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुढील काळात अशा प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने राबविण्यात येणार आहेत. अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये धडकी भरली असून, गिरणा नदीच्या परिसरातील अवैध वाळू उपशाला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.



