Home क्राईम विवराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त ; महसूल विभागाच्या कारवाईने खळबळ

विवराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त ; महसूल विभागाच्या कारवाईने खळबळ


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विवरा गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल विभागाने जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे काही काळासाठी तरी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

रावेर तालुक्यात गेल्या काही काळापासून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, अपेक्षित कारवाया होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. गौण खनिजाची सैराट लूट सुरू असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता. आता या प्रकाराकडे थेट जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तहसीलदार संजय तायडे यांनी अवैध गौण खनिज उत्खननाबाबत दाखवलेल्या कडक भूमिकेनंतर महसूल प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या स्पष्ट सूचनेनंतर महसूल पथकाने सलग दोन दिवसांत दोन ठोस कारवाया केल्या असून, कारवाईत कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम संदेश तहसीलदारांनी पथकाला दिला आहे.

आज विवरा परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंडळाधिकारी यासिन तडवी यांच्या नेतृत्वाखाली निलेश धांडे, सुषमा घरडे, ग्राम महसूल अधिकारी कैलास चव्हाण, भारत वानखेडे, कमलाकर हटकर, प्रशांत जाधव, भूषण कांबळे आणि सुधीर इंगळे यांनी छापा टाकून संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातून वाहणाऱ्या भोकर नदी, सुकी नदी आणि तापी नदीच्या पात्रातून तसेच विविध शासकीय मुरुम बर्डींमधून दररोज हजारो ब्रास अवैध गौण खनिजाची लूट होत असल्याचा आरोप आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शासनाचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे अशा कारवाया केवळ अपवादात्मक न राहता सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound