नाशिक-वृत्तसेवा । स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक पोलिसांनी बुधवारी (१८ मार्च) पहाटे अटक केली. मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खरातच्या अटकेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित अशोक खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत तिचा विश्वास संपादन केला. मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तिला वारंवार आपल्या संपर्कात ठेवले. त्यानंतर तिला कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार २०२२ पासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली असता एक पेनड्राइव्ह हस्तगत करण्यात आला. या पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चित्रीकरण असल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ अर्थात ‘शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वलय निर्माण केले होते. अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्ती त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
तसेच, या संस्थेच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याची चर्चा असून, संस्थेच्या अध्यक्षावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्या काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने २२ वर्षांच्या सेवाकाळात १५४ देशांचा प्रवास केल्याचा दावा केला आहे. ‘कॉस्मॉलॉजी’च्या नावाखाली तो लोकांचे भविष्य सांगत असे. विज्ञानाचा आधार घेत अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक केल्याचा संशय आता पोलिस तपासातून पुढे येत आहे.



