जळगाव प्रतिनिधी | इतर मागासवर्गीस समुदायाच्या विविध मागण्यांसाठी उद्या राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे आकाशवाणी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार असून यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारच्या आठमुठेपणामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधीच केला असून याबाबत आंदोलन देखील केले आहे. आता केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनास संविधानावर विश्वास असणार्या प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे. या आंदोलनात ओबीसी सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली आहे.