जयपूर वृत्तसंस्था । भारतीय हवाई दलात तब्बल चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असणार्या ‘मिग-२७’ लढाऊ विमानांचा प्रवास उद्या (दि.२७) संपुष्टात येत आहे. ‘मिग-२७’ दर्जातील सात लढाऊ विमानांना जोधपूर एअरबेसवर अलविदा करण्यात येणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सद्धस्थितीत मिग-२७ श्रेणीतील विमानं इतर कोणताही देश वापर करत नाही. फक्त भारतात ही लढाऊ विमाने वापरली जात होती. यावेळी या श्रेणीतील सातही विमानांचे अखेरचे उड्डाण होणार आहे. ‘मिग-२७’ विमानांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर एअरबेसवर पोहोचली आहे. सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीने मिग-२७ विमानांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी मिग-२७ श्रेणीतील सातही विमानांचे उड्डाण होईल. त्यानंतर हवाई दलाकडून या विमानांना सॅल्यूट केला जाईल.