रावेर (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या १३ कोटी रुपयांच्या कामांचा हिशोब द्या. केलेल्या कामांमुळे जलपातळी किती वाढली, हे जाहीर करून सांगा, ज्या भागात जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली तोच भाग पाणी टंचाईग्रस्त कसा ? तालुक्यात सरासरी पाऊस असतांना जलयुक्त शिवारातून पाणी गेले कुठे ? असे अनेक गंभीर प्रश्न असलेले जलपातळी व ढिसाळ नियोजनासंदर्भातले एक निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना आज देण्यात आले. त्याद्वारे पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेसने हे निवेदन दिले असून त्यात मंगरुळ मध्यम प्रकल्पातुन पाटचा-याद्वारे मोरगांव कर्जात वाघोडकडे पाणी सोडण्यात यावे, जलयुक्त शिवार योजनेमार्फत झालेल्या १३ कोटी रूपयांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, भोकर कोल्हापुरी बंधा-याची दुरुस्ती करण्यात यावी, सुकी नदी, भोकर नदी, मात्राण नदी व नागोई नदीवर प्रत्येक पाच कि.मी. अंतरावर नवीन बंधारे करण्यात यावे, हतनूर धरण, सुकी धरण, मात्राण धरण व आभोडा धरणातील गाळ काढण्यात यावा, तालुक्यांतील नदी व नाल्यांमधून शेतकऱ्यांना नि:शुल्क गाळ वाहतुक करण्याची परवानगी देण्यात यावी, तालुक्यांतील सर्व जिर्ण बंधा-यांची दुरुस्ती करण्यात यावी व मजूरांच्या हाताला काम व गुरांना चारा छावण्या सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, किशोर पाटील, शहरध्यक्ष महेमुद शेख, उपाध्यक्ष जितेंद्र साबळे, नगिनदास चौधरी, सत्तार शेख अस्पाक शेख गफार, यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.