चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यासह जिल्ह्यातील नव्हे तर, राज्यातील सर्वच पत्रकार बांधवांचे मला सहकार्य मिळत राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शन सूचनांच्या जोरावर आजपर्यंत विकासाची वाटचाल करतो आहे. माझ्या विजयात पत्रकार संघाचा मोलाचा वाटा आहे. म्हणून पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे, मत जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी येथे केले. चाळीसगाव वृत पत्रकार संघाच्या वतीने आज सकाळी उन्मेष पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या, सूचना मला अधिक प्रकर्षाने माहीत होतात. त्यामुळे त्यांच्या सोडवण्यासाठी जोमाने काम करता येते. जनता आणि शासन यांच्यातील समन्वयाचा एक पवित्र धागा म्हणून पत्रकार महत्वपूर्ण असतो. मला निवडणुकीसाठी कमी अवधी मिळालेला असताना मी चाळीसगाव तालुक्यात केलेली विकासकामे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचल्याने मला विक्रमी मताधिक्य मिळाले. पत्रकार बांधवांच्या भवनाच्या जागेचा विषय आपण मार्गी लावा. जबाबदारीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. पाच लाख रुपयांचा निधी पत्रकार भवनासाठी देतो. तसेच भविष्यात ही पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव मुरलीआबा पाटील , ज्येष्ठ संचालक रमेश जानराव यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. सुरवातीला पत्रकार संघाचे वतीने खासदार उन्मेष पाटील यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लोकमतचे पत्रकार जिजाबराव वाघ यांनी प्रास्ताविकातून खासदार उन्मेष पाटील यांच्या यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला. अध्यक्ष आर.डी.चौधरी यांनी पत्रकार संघाचे वतीने खासदार उन्मेष पाटील यांनी संपादन केलेल्या दिमाखदार विजयाचे कौतुक केले. तसेच पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे वरखेड लोंढे धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी भावना व्यक्त केली. जनशक्तिचे उपसंपादक अर्जुन परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सत्कार समारंभास पत्रकार गणेश पवार , मोतीलाल अाहिरे, नारायण जेठवाणी, सी.सी.वाणी, सुर्यकांत कदम , अझीझ खाटीक, स्वप्नील वडनेरे, गणेश पाटील, श्रीकांत भामरे, नारायण परदेशी यांच्या सह पत्रकार बांधव उपस्थित होते.