कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) तालुक्यातील फरकांडे ते नांदखुर्दे या दोन कि. मी. रस्त्याच्या कामास राज्य शासनामार्फत मुंजरी मिळाली होती. त्यानुसार सहा महिन्यापुर्वी आमदार डॉ. सतीष पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतू सदर रस्त्याचे काम आजच्या घडीला अर्धवट असून काम बंद पडलेले आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्त्याचे काम लवकर न झाल्यास नागरिकांना प्रचंड मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
फरकांडे ते नांदखुर्दे रस्त्यावरील उतावळी नदींच्या पुलाचे काम अर्धवट असल्याने पावसाळयात बैलगाडी व इतर वाहने जावू शकणार नाहीत. तसेच सदर रस्ता एरंडोल येण्यासाठी फरकांडे, नांदखुर्दे, जळू या गावांना अत्यंत सोईचा व कमी अंतराचा असल्यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैशांची बचत करणारा आहे. या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून बंद पडले असून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संपर्क साधून तोंडी सुचना देवून ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. तसेच या रस्त्याच्या सर्वेक्षण करतांना फरकांडे गावालगतच रस्त्यावरच गावाला विजपुरवठा करणारा टान्सफार्मर आहे. तो स्थलांतरीत करण्यासाठी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग एरंडोल व विज वितरण कंपनी एरंडोल हे एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असून सदर टान्सफार्मर हलविण्याची जबाबदारी कोणीही स्विकारण्यास तयार नाही. फरकांडे ते नांदखुर्दे रस्ता त्याच रस्त्यावरच येणारा उतावळी नदीचा पुल, रस्त्याच्या साईड पट्टयांचे काम पावसाळयापुर्वी पुर्ण करुन शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय थांबविण्याची मागणी फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांनी एका पत्रकान्वये केली आहे.