यावल (प्रतिनिधी) येथील सुमारे १०३ वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज रथोत्सवास येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिराजवळ नदिपात्रातून उद्या (दि.१९) सायंकाळी प्रारंभ होणार असुन शहरात आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला हा रथोत्सव गेल्या १०३ वर्षांपासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात असतो.
त्यावेळी श्री बालाजी रथाची श्री महर्षी व्यास मंदिराजवळील हडकाई- खडकाई नदी पात्रात विधिवत पुजा केली जाते. तेथुन हा रथ चोपडा-यावल रोडवरील महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात श्री खंडोबा महाराज यांची मोठी यात्रा भरते तेथे सांयकाळी येऊन थांबतो. या ठिकाणी खंडोबाच्या १२ गाड्या ओढल्या जातात या नंतर तेथुन पुढे श्री बालाजी रथ शहरातुन फिरण्यासाठी मार्गस्थ होतो.
शहरातील मेनरोड, चावडीमार्गे बेहेडे सुपर शॉप, महाजन टी-डेपो, बोरावल गेट परीसर, देशमुख वाडा, लक्ष्मी नारायण मंदीर (वाणी गल्ली) असे रात्रभर फिरून दुसऱ्या दिवशी सकाळी रेणुका माता मंदिराजवळ श्री बालाजी रथोत्सवाचा समारोप होतो. हा रथोत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत असतात. तसेच शहरात हनुमान जंयतीनिमित्त मोठा मारूती मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिराजवळील हनुमान मंदिर, चावडी तसेच शहरातील हनुमान मंदीरामध्ये विधिवत पुजा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
रथोत्सवाचा इतिहास :- माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै. पांडूरंग धोंडू
देशमुख व तत्कालीन प्रतिष्ठितांनी सन १९१४ मध्ये रथोत्सव सुरू केला होता.
तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. रथावर श्री बालाजी महाराजांची
प्रतिमा आरूढ आहे. येथील जुन्या पिढीतील रामजी मिस्त्री यांनी अत्यंत
कलाकुसरीने नगर शोभेसाठी हा रथ विनामुल्य तयार करून करून दिला होता, असे जुन्या
पिढीतील लोकांचे म्हणणे आहे.
पारंपरिक रथमार्ग:- चावडी, मेनरोड, बोरावलगेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिर
मार्गे देवीच्या मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास रथोत्सवाची सांगता
होते. शहरातील अरूंद व चढ-उताराचे रस्ते, रथाची भव्य उंची, सुमारे १२ टन
वजन असलेल्या या रथास मोगरी लावणे, आणि त्यास वळविणे, ही कामे अत्यंत
अवघड असून त्यासाठी कसब पणाला लावावे लागते. यासाठी पुर्वीपासूनची नेमलेली मंडळीच
ही कामे करतात. रथासोबत असेलेले विशिष्ट पेहरावातील भालदार-चोपदार
मंडळी शहरवासियाचें लक्ष वेधून घेत असतात. रथोत्सावाचा दिवस म्हणजे
यावलकरांची आनंदपर्वणीच आहे. याशिवाय येथे दिनांक १९ एप्रील २०१९ रोजी येथे हनुमान जयंतीनिमित चोपडा जुना नाका ते डांगपुरा मस्जिद पर्यंत १२ गाडया ओढण्याचाही कार्यक्रम होणार आहे. या उत्सवांच्या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवु नये या साठी शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार हा शनिवारी भरवला जाणार आहे. याची बाजारात सामान विक्रीस आणणारे शेतकरी व व्यापारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन येथील नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.