यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतमध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्याची चौकशी व कार्यवाही करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे यावल तालुकाध्यक्ष अनिल तुळशीराम इंधाटे यांनी यावल पंचायत समितीच्या कार्यालय समोर आज ( दि.४ फेब्रूवारी ) सकाळी १० वाजेपासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या माध्यमातुन दयाराम मुरलीधर सोनवणे व किशोर वसंत भालेराव यांना वर्ष २००९ व १० तसेच २०१३ व १४ या वर्षात इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळाला असुनही या दोघा लाभार्थ्यांना सन २०१६-१७ मध्येही पंतप्रधान आवास योजनेचा दुसऱ्यांदा लाभ देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात अनिल तुळशीराम इंधाटे यांनी वारंवार यावल येथील गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव, तसेच जिल्हाधिकारी जळगाव व इतर वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करून देखील कुठल्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही होत नसुन उलट ज्या बोगस लाभार्थ्यांच्या विरोधात आपण तक्रार दाखल केली आहे त्यांचाकडुन मला जीवे ठार मारण्याची धमकी मिळत असुन यात एका ग्रामसेवकाचाही समावेश असल्याची तक्रार निवेदनात अनिल इंधाटे यांनी केली आहे. या घरकुल योजनेच्या बोगस लाभार्थ्यांची जो पर्यंत चोकशी होवुन कार्यवाही होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.