अमळनेर प्रतिनिधी । आपल्या मनात भूतकाळाला ठाण मांडून बसू न देता, भविष्याची अती चिंता न करता, आपण आहे. त्याक्षणी जीवनाचे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत सक्रिय रहाणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केले. “आपला चौथा स्तंभ”च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसार माध्यमात विशेष योगदान दिल्याबद्दल व देत असल्याबद्दल देवेंद्र भुजबळ यांचा सपत्नीक विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते.
श्री. भुजबळ पुढे म्हणाले, ३५ वर्षे प्रसारमाध्यमात सक्रिय राहुन निवृत्त झाल्यावर पुन्हा नोकरी करायची नाही, असे मी ठरविले होते. पण सेवानिवृत्त व्यक्तींकडे बघण्याचा, वागण्याचा समाजाचा, दृष्टीकोण निकोप नाही,असे अनुभव येत गेले.नातेसंबंध बदलू लागले. म्हणून नुसता आराम करत न बसता माझ्या आवडीच्या बातमीदारीकडे, मुलाखती घेण्याकडे, लेख लिहिन्याकडे, विविध विषयांवर व्याख्याने,भाषणे देण्याकडे ,कार्यशाळेत,परि संवादात सहभागी होण्याकडे, सभा, सम्मेलनं, पर्यटन, समुपदेशन अशा अनेक बाबीत लवकरच सक्रिय झालों. आज चोवीस तास मला पुरत नाही, अनेक ठिकाणी आमंत्रणं मिळूनही,इच्छा असूनही वेळेअभावी उपस्थित राहता येत नाही, याची खंत वाटतेय. कुठल्याही एका क्षेत्रातील प्रगतीने देशाची प्रगती होत नसते. सर्वच क्षेत्रात समान प्रगती होणं गरजेचं असते. म्हणून स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीचा विचार करून विद्यार्थ्यांनी,पालकांनी विशिष्ट अभ्यासक्रमांच्या मागे न जाता, नवनवे अभ्यासक्रम शोधून नव्या दिशा, नव्या वाटा निवडाव्यात, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आपला चौथा स्तंभचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ पत्रकार श्री विजयकुमार बांदल यांची मुक्तकंठाने स्तुती केली. आपल्या खुशखुशीत शैलीत त्यांनी राजकीय भाष्यही केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनील गलगली उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांचा यावेळी प्रमुख सन्मान करण्यात आला. सर्वंश्री गलगली, परब, इतर सन्मानमूर्ती यांनीही यावेळी समयोचित मनोगते व्यक्त केली. प्रारंभी विजय बांदल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी रेखा रमेश ठाकूर लिखित, विजयकुमार बांदल शब्दांकित “नशा” पुस्तकाचं मान्यवरांनी प्रकाशन केलं. तसंच पत्रकारिता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी पत्रकारिता विद्यार्थी, रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.