मुंबई प्रतिनिधी । कोकणातील रत्नागिरी व चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण रात्री फुटल्याने सात गावांमधील अनेक जण वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्त असे की, वशिष्ठी नदीवर रत्नागिरी व चिपळूण तालुक्यांमध्ये तिवरे येथे धरण बांधण्यात आलेले आहे. रात्री सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास हे धरण फुटले असून याच्या खाली असणार्या सात गावांमध्ये अक्षरश: हाहाकार निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार धरण फुटल्याने आलेल्या महापुरात किमान २० पेक्षा जास्त लोक वाहून गेले असून यातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान, आज सकाळी एनडीआरएफचा चमू येथे येणार असून यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींसह अधिकार्यांनी रात्रीच या परिसरातील गावांना भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. दरम्यान, या भागातील गावकर्यांनी आधीच धरणाला तडे गेल्याची माहिती संबंधीत विभागाला दिली असली तरी यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. दरम्यान, धरण फुटल्यामुळे याच्या पाणलोट क्षेत्रात असणार्या तिवरे, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे आदी गावांमध्ये पाणी शिरले असून यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचीही शक्यता आहे.