जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून हरीविठ्ठल नगरात आजीकडे राहण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ११ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) असे विवाहितेचे नाव आहे.
हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना राठोड यांचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यांपूर्वी जळगावात हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागल्या होत्या. मंगळवार, ११ जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले असता त्यांना मीना या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्या वेळी त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना माहिती दिली. ते तेथे पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, मीना राठोड यांना पती सतत मारहाण करीत होता, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. या मारहाणीमुळेच विवाहिता आजीकडे आली होती. पतीकडूनच तिला त्रास दिला जात होता, असे त्यांचे म्हणणे होते.




