Home क्राईम दोघांच्या जांचाला कंटाळून वृध्दाने केलं अस काही !

दोघांच्या जांचाला कंटाळून वृध्दाने केलं अस काही !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराचे बांधकाम सुरू असतांना शालक व शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या जांचाला कंटाळून एका ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर तालुक्यातील नीम गावात घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण तुकाराम कोळी वय ६५ रा. नीम ता.अमळनेर असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण कोळी हे आपल्या पत्नी जिजाबाई कोळी यांच्यासोबत वास्तव्याला होतो. काही महिन्यांपुर्वी लक्ष्मण कोळी यांनी गावात राहणारा शालक कैलास झेंडू कोळी यांच्याकडून जागा विकत घेतली होती. या जागेत लक्ष्मण कोळी यांनी १ महिन्यांपासून बांधकाम सुरू केले होते. बांधकाम करत असतांना खड्डा खोदणे किंवा माती टाकण्यावरून त्यांचा शालक कैलास कोळी आणि त्याचा शेजारी राहणारा ज्ञानेश्वर एकनाथ कोळी या दोघांनी लक्ष्मण कोळी यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच वेळोवेळी मानसिक त्रास व भांडण करत होते.

लक्ष्मण कोळी यांची पत्नी जिजाबाई कोळी ह्या काही दिवसांपासून भुसावळ येथील त्यांच्या मुलीकडे गेल्या होता. त्यामुळे ते घरी एकटेच होते. शालक कैलास कोळी आणि शेजारी राहणारा ज्ञानेश्वर कोळी यांच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मण कोळी यांनी शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजात राहत्या घरात गळफास घेतला. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांची पत्नी जिजाबाई व मुलगी शोभा कोळी यांनी नीम गावाकडे धाव घेतली. यासंदर्भात जिजाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास झेंडू कोळी आणि ज्ञानेश्वर एकनाथ कोळी दोन्ही रा. नीम ता.अमळनेर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound