
नाशिक लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अवघ्या काही तासांच्या अंतरात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना हादरवून टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी एका अपघातात साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या सुरत येथील तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत रस्त्यावरील खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला.

पाहिली घटना : साईभक्तांच्या गाडीचा येवल्याजवळ भीषण अपघात
गुजरातच्या सुरत येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या भाविकांवर नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काळाचा घाला पडला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या हद्दीत ही भीषण दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव असलेल्या फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरच तीन वेळा पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात सुरत येथील तीन साई भक्तांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर, गाडीतील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दुसरी घटना : खड्ड्यांमुळे कोपरगावजवळ तरुणाचा बळी
दुसरीकडे, नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी कोपरगावजवळ एका तरुणाचा बळी घेतला. अपघाताच्या दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असून, महामार्गावरील धोकादायक स्थिती व खड्ड्यांमुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अवघ्या काही तासांत झालेल्या या दोन अपघातांमुळे एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.



