नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तिहार जेलमध्ये एका मुस्लीम कैद्याच्या पाठीवर जेल अधीक्षकाने गरम केलेल्या हत्याराच्या साहाय्याने ‘ॐ’ अस अक्षर कोरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाबीर असे पिडीत कैद्याचे नाव आहे. दरम्यान, कडकडडुमा कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी जेल अधीक्षक राजेश चौहान यांनी आपल्या पाठीवर ॐ हे अक्षर कोरले असल्याचा गंभीर आरोप कैदी नाबीरने केला आहे. दुसरीकडे जेल अधीक्षक राजेश चौहान यांनी सर्व आरोप फेटाळले असून जेलमधून शिफ्ट होण्यासाठी नाबीरने हे आरोप लावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र नाबीरच्या पाठीवर ॐ कुणी केले हा सवाल मात्र अनुपस्थित आहे.
कैदी नाबीरने केलेल्या आरोपानंतर कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. कोर्टाने डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्यांना या चौकशीचे आदेश दिले दिले असून हे अधिकार लवकरच अहवाल देणार आहेत. तिहारच्या जेल नंबर चारमध्ये नाबीरला ठेवण्यात आले होते. या जेलचे अधीक्षक चौहान यांनी आपल्या पाठीवर ‘ॐ’ हे अक्षर कोरले असल्याचा गंभीर आरोप नाबीरने कोर्टासमोर केला आहे. कैदी नाबीरला शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला तिहारच्या जेल क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले होते.
नाबीरने केलेल्या आरोपानुसार जेलमध्ये इंडक्शन खराब झाले असल्याची तक्रार त्याने केली होती. त्यावर काही कार्यवाही न झाल्याने त्याने वारंवार तक्रारी केल्याने जेल अधीक्षक भडकले आणि त्यांनी नाबीरला आपल्या कार्यालयात बोलावले. कार्यालयात आल्यानंतर ‘तू खूप तक्रारी करतोस, तुला आज धडा शिकवतो’ असे म्हणत जेल अधीक्षकांनी नाबीरला मारहाण केली. यावेळी गरम केलेल्या लोखंडाच्या मदतीने त्याच्या पाठीवर ॐ कोरले असल्याचा आरोप त्याने केला आहे. सोबतच पाठीवर सिगारेटचे चटके देत त्याला दोन दिवस जेवण देखील दिले नसल्याचा आरोप नाबीरने केला आहे.