Home Cities रावेर पाल येथे व्याघ्र संवर्धन जनजागृती; बिबट्याच्या दर्शनाने विद्यार्थी भारावले!

पाल येथे व्याघ्र संवर्धन जनजागृती; बिबट्याच्या दर्शनाने विद्यार्थी भारावले!


पाल ता.रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाल येथे व्याघ्र संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावल उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला.

लालमाती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आणि पाल येथील इतर दोन शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘मानवी वाघ’ हेमराज सपकाळे ठरले. त्यांनी “मी वाघ बोलतोय” या धर्तीवर वाघाचे मनोगत व्यक्त करत वन्यजीव कसे असतात, कोणत्या परिस्थितीत ते मानवी वस्तीत शिरतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मानवी वाघासोबत नृत्य करत निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली, तर वनरक्षक राजू बोन्दल यांनी वनविभागाच्या प्रयत्नांना गावकरी आणि विद्यार्थ्यांनी कसे सहकार्य करावे, तसेच जंगल सुरक्षित राहिल्यास त्याचा गावकऱ्यांना कसा फायदा होईल, यावर मार्गदर्शन केले. यावेळी आश्रमशाळा तसेच वन कुट्यांवरील वनमजुरांना चटयांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव योगेश गलफाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

दुपारच्या सत्रात विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहभागी विद्यार्थ्यांसोबत सफारी गेटजवळ १०० भारतीय रोपांचे रोपण करण्यात आले. तसेच, वाशीम येथील कोब्रा अडव्हेंचर संस्थेचे आकाश आहाले यांनी आणलेले २०० सीड बॉल (बीजगोळे) सफारी मार्गांवर टाकण्यात आले, ज्यामुळे परिसरात वृक्षारोपण होऊन वन्यजीवांचा अधिवास वाढण्यास मदत होईल.

कार्यक्रमादरम्यान झालेल्या सफारीमध्ये विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले, ज्यामुळे ते चांगलेच भारावले. शब्बीर तडवी यांच्या सफारी वाहनास २ किलोमीटर अंतरावर बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, सर्वांनाच मोर, लांडोर यांचे दर्शन झाले, तर सायाळ (इंडियन पोर्क्युपिन) आणि तिची तीन पिल्ले यांचा मुक्त संचार मनमोहक होता. वन्यजीव संस्थेच्या व्याघ्र दूतांना तरस (स्ट्राइप्ड हायना) आणि सायाळचेही दर्शन झाले.

जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद आणि यावल उपवन संरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात सफारीचे काम सुरू झाल्यापासून या भागाला विशेष संरक्षण प्राप्त झाले आहे. भविष्यात याचा फायदा येथील वन्यजीव अधिवास वाढण्यास होणार आहे, असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले. सहभागी व्याघ्र दूत, वनकर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सहभाग पत्र देऊन गौरवण्यात आले. संस्था उपाध्यक्ष सतीश कांबळे, प्रदीप शेळके, मुकेश सोनार यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल वनविभागाचे वनपाल अरुणा ढेपले, वनरक्षक राजू बोण्डल, सुपडू सपकाळे, सविता वाघ, मुकेश तडवी, जगदीश जगदाळे, संजय राजपूत, आयेशा पिंजारी, आश्रफ तडवी, हेमलता बारेला, उषा बारेला यांनी परिश्रम घेतले. तसेच, वन्यजीव संस्थेचे बाळकृष्ण देवरे, सतीश कांबळे, योगेश गालफाडे, रवी भोई, अजीम काझी, निलेश ढाके, राजू गुप्ता, विकास गायकवाड, राजेंद्र वाघ, दिनेश सपकाळे, ऋषी राजपूत, समाधान गोसावी, स्कायलेब दिसूझा यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound