यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाच्या उपस्थितीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, परंतु आज पहाटे भोरटेक गावाजवळील एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर वाघाने थेट हल्ला चढवून एका म्हशीला ठार केल्याने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोरटेक येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्यात वाघाने पहाटेच्या सुमारास घुसखोरी केली आणि एका म्हशीवर हल्ला करून तिला ठार मारले. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघाचा वावर मानवी वस्तीजवळ असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षेसाठी अधिकच काळजीत पडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला तत्काळ सूचित केले. त्यानंतर यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डोंगरकठोरा आयएएस तडवी, वनपाल फैजपूर अतुल तायडे, गस्तीपथकाचे आर. एम. जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, आयबी चव्हाण आणि वाहन चालक वाय. डी. तेली हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाच्या पावलांचे ठसे, केस आणि इतर पुरावे गोळा करत त्याच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे, रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचे आणि शेतीकामे शक्यतो गटाने करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडून तातडीने वाघाला पकडून सुरक्षित स्थळी हलवण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मानवी जीवितहानीसारखी गंभीर घटना घडू शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कासवा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी यांनी आमदार अमोल जावळे यांना संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. आमदार जावळे सध्या मुंबई विधानसभेच्या अधिवेशनासाठी उपस्थित असून त्यांनी मुंबईहूनच वनक्षेत्रपाल स्वप्निल पटांगरे यांना वाघाला तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे पाडळसे व भोरटेक परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे. वाघाचा धोका लक्षात घेता वनविभागाने जलदगतीने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिक एकत्रितपणे काम करून संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.



