जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आनंद शांतीनगरात घराच्या दरवाजाला दगड मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोग्यसेवक प्रदीप अमराज अडकमोल (वय ४६) यांच्या घरावर दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच दुचाकीचेही नुकसान केले. ही घटना बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक असलेले प्रदीप अडकमोल यांचे जळगावातील आनंद शांतीनगरात घर आहे. बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाला दगड मारल्याचा आवाज आल्याने अडकमोल दाम्पत्य बाहेर येवून जाब विचारला असता त्यांना दोन जणांनी अश्लील शिवीगाळ केली. त्यातील एकाने दुचाकीची तोडफोड करीत दगडफेक केल्याने कुलरचे नुकसान होण्यासह खिडकीच्या काचा फुटल्या. एवढ्यावरच न थांबता दुसऱ्याने पती-पत्नीच्या दिशेने चाकू दाखवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे अडकमोल कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली असता तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सागर हिमलेश दोहरे (वय १९) व तुषार गोविंदा जाधव (वय २०) दोन्ही रा. कोल्हे हिल्स जवळ, जळगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक चाकू हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रदीप अडकमोल यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.