यावल ( प्रतिनिधी): ज्येष्ठ घराचा आधार आहे, तर आई घराची राखणदार आहे. संस्कारक्षम वृक्ष म्हणून जेष्ठांकडे बघितले जाते. संस्कारक्षम पिढी घडविण्यात जेष्ठांचा सल्ला घेणे गरजेचे आहे यामुळे समाजाला दिशा मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले.
ते महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सभागृहासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी विकास निधीअंतर्गत दहा लाख रुपये निधी देण्याची घोषणा यावेळी केली. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाचे सचिव प्रभाकर झोपे यांनी वार्षिक सभेच्या विषयांचे वाचन केले. मंडळाच्या कार्यकारणीची मुदत संपली असल्यामुळे याच सभेत सन २०१९ते २०२४ या कालावधीसाठीची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त मुरलीधर पाठक यांनी कामकाज पाहिले. कार्यकारी मंडळाची नवीन कार्यकारिणी बहुमताने मंजूर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सभेच्या कामकाजाची सूत्रसंचालन सचिव प्रभाकर झोपे यांनी केले.
नूतन कार्यकारिणी अशी…
चंद्रकांत देशमुख (अध्यक्ष ), देवराम राणे (उपाध्यक्ष), प्रभाकर झोपे (सचिव),मोहन चौधरी( सहसचिव) सुभाष बारी ( कोषाध्यक्ष), रमेश देशमुख ( सहकोषाध्यक्ष ), सदस्य… दगडू शेठ मंदवाडे, काशिनाथ बारी, पांडुरंग महाले,मुरलीधर पाठक, सुधाकर बाऊस्कर, लीलाधर चौधरी, श्रीहरी कवडीवाले,सुनंदा देशमुख, रोहिणी पाठक.
आ. जावळे लढविणार अखेरची विधानसभा निवडणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे पक्षातील ७५ वर्षाचे वरील व्यक्तीस निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्यामुळे, आणि माझे सध्या ६७ वर्ष वय सुरू असल्याने माझी यावेळची विधानसभा निवडणूक ही अखेरची आहे.अशी घोषणा आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे संघाचे तत्व पाळणारा मी निष्ठावंत स्वयंसेवक आहे.अशी पुष्टीही आमदार जावळे यांनी यावेळी जोडली.