जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विज्ञानाची आवड आणि खगोलशास्त्राबद्दलची जिज्ञासा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शहरातील नूतन मराठा महाविद्यालय आणि स्वर्गीय दादासाहेब देवराम खुशाल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चंद्र आणि ज्युपिटरचे प्रत्यक्ष दुर्बिणीतून दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी मिळाली.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा आकाश दर्शनाचा सोहळा रंगला. अत्याधुनिक टेलिस्कोपच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना आकाशातील विविध ग्रह, नक्षत्रे आणि तार्यांचे बारकाईने निरीक्षण करता आले. विशेषतः चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे आणि ज्युपिटरच्या तेजस्वी उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच इतक्या जवळून खगोलीय दृश्य अनुभवले.

या कार्यक्रमासाठी मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र चे निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आनंद घ्यायचास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी खगोलशास्त्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत स्पष्ट केल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी संयमाने उत्तरे देत विज्ञानातील कुतूहल अधिकच प्रज्वलित केले.
जळगावचे खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनीही आकाशातील घडामोडी, ग्रहांची हालचाल, तारकासमूहांची रचना आणि निरीक्षणाच्या तांत्रिक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी लाभली.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील यांच्यासह प्राचार्यवृंद, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण लाभले.



