भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील अत्यंत गजबजलेल्या बसस्थानक परिसरात रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, कार चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून चालक थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी विकी साबने हे रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी आपल्या कारने (क्रमांक MH 19 CF 3778) जात होते. त्यांनी जवळच्याच एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरले आणि ते घराच्या दिशेने निघाले. कार बसस्थानकाजवळ आली असता, अचानक कारच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी वेळ न घालवता कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तातडीने गाडीबाहेर उडी घेतली.

चालक बाहेर पडल्यानंतर काही क्षणांतच कारने भीषण पेट घेतला. भररस्त्यात जळती कार पाहून परिसरात नागरिकांची मोठी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून कारला लागलेली आग आटोक्यात आणली.
या आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भरवस्तीत आणि ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.



