मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राजधानी मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असून, या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे.

सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना विविध कोर्सेस किंवा अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घेत आहेत. अशातच पवईतील आरए स्टुडिओमध्ये काही दिवसांपासून चालू असलेल्या ऑडिशनदरम्यान शाळकरी मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. माहिती मिळताच मुंबई पोलिस, एनएसजी कमांडो आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ऑपरेशन सुरू केले.

साक्षीदारांच्या माहितीनुसार, आरोपी रोहित आर्यने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुलांना जेवणानंतर एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले. या खोलीत दोन पालकांसह १७ मुले होती. आरोपीने व्हिडिओद्वारे आपल्या कृतीची कबुली देत म्हटले की, “मी आत्महत्या करण्याऐवजी काही मुलांना ओलीस ठेवले आहे. माझ्या मागण्या साध्या आणि नैतिक आहेत. मला काही प्रश्न विचारायचे आहेत, मी दहशतवादी नाही.”
दरम्यान, प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की रोहित आर्य हा शिक्षण विभागाशी संबंधित एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे मानसिक तणावात होता. त्याने सरकारकडे प्रलंबित पैशांच्या मागणीसाठी पूर्वी उपोषणही केले होते. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
पोलिसांना घटनेची माहिती पावणे दोनच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी तातडीने विशेष पथक आणि क्विक अॅक्शन फोर्स तैनात केली. पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून आत प्रवेश करून एका स्थानिकाच्या मदतीने सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी फायरिंग केली आणि त्यात रोहित आर्य जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या कारवाईत दोन जण जखमी झाले असून, एका महिला आणि एका लहान मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलांना आणि पालकांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. सुदैवाने सर्व मुले सुखरूप आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या घटनेनंतर पोलिसांचे कौतुक करत म्हटले की, “मुंबई पोलिसांनी वेळीच कारवाई करून मोठा अनर्थ टाळला. पालकांनी आणि सोसायटी व्यवस्थापनांनीही अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल.”



