Home क्राईम महामार्गावर थरार! भरधाव कंटेनरने चिरडल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

महामार्गावर थरार! भरधाव कंटेनरने चिरडल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भावजयीच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपून जड अंतःकरणाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. शनिवारी दुपारी कंडारी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बसच्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्ध समोरून येणाऱ्या कंटेनरखाली चिरडले गेले. प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मन्यारखेडा, ता. भुसावळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेत त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद बाविस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई बाविस्कर हे विटनेर येथे आपल्या भावजयीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९, ईडी ९३३९) मन्यारखेडाकडे परतत होते. नेरीकडून येत असताना कंडारी फाट्याजवळ मागून येणाऱ्या बारामती-रावेर बसने (क्र. एमएच १४, एमएच ७४०१) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

बसच्या धडकेमुळे दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि बाविस्कर पती-पत्नी विरुद्ध दिशेला फेकले गेले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एमएच १९, सीएक्स ३२८९) पुढील चाकाखाली प्रल्हाद बाविस्कर आले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुनीताबाई या बाजूला फेकल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह आणि जखमी महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. सध्या सुनीताबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त बस आणि कंटेनर दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound