Home क्राईम वाकोदमध्ये थरार : उभी बैलगाडी बसने चिरडली ; व्हिडीओ पाहून अंगावर येईल...

वाकोदमध्ये थरार : उभी बैलगाडी बसने चिरडली ; व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जामनेर तालुक्यातील वाकोद येथे एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या एका सुसाट खाजगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोराची धडक दिली. या धडकेत बैलगाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने बैलगाडीवर असलेला शेतकरी यातून थोडक्यात बचावला आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरून बुधवारी १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता एक खाजगी ट्रॅव्हल्स बस पुण्याच्या दिशेने अतिवेगाने जात होती. वाकोद गावानजीक रस्त्याच्या बाजूला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन उभा होता. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगाने येणाऱ्या बसने थेट बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

शेतकऱ्याचा पुनर्जन्म :
धडक इतकी भीषण होती की बैलगाडीचे लाकडी भाग हवेत उडाले आणि गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्ये पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे, बैलगाडीवरील शेतकरी या भीषण अपघातातून आश्चर्यकारकरीत्या सुखरूप बाहेर पडला आहे.

ग्रामस्थांचा संताप आणि रास्ता रोको :
या अपघातानंतर वाकोद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. महामार्गावर वाहनांच्या वाढत्या वेगामुळे वारंवार अपघात होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत वाकोद गावाजवळ गतिरोधक बसवले जात नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound